जळगाव जिल्ह्यात शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये ‘कोविड’ उपचारावरून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही नेत्यांच्या कोविड केंद्रांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे.
जळगाव जिल्ह्यात ‘कोविड’ चे रूग्ण वाढत आहेत. सत्ताधारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कोविड रूग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी प्रयत्नशिल आहेत. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून ते कोविड रूग्णांसाठी जिल्ह्यातील कोविड केंद्रात सुविधा मिळवून देत आहे. अशा वेळी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष मात्र त्यांच्या विरोधात टिकेची संधी मात्र सोडत नाही.
भारती जनता पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हयाचा दौरा करून ‘कोविड’ केंद्रांना भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यानी जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या कोविड केंद्रास भेट देवून त्या ठिकाणच्या उपचाराची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सूचनाही केल्या होत्या.
मात्र यावेळी त्यांनी चांगले उपचार मिळत नसल्याबाबत सरकारवर टिकाही केली होती. तर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील मंत्र्यावर थेट टीका करीत ‘मंत्री घरातच बसून आहेत, आम्ही मात्र फिरत आहोत,’ असा आरोप केला होता परंतु ते नुसता आरोप करून थांबले नाहीत, तर जी.एम.फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी रायसोनी महाविद्यालच्या वसतीगृहात ४०० बेडचे कोविंड केंद्र सुरू करण्याची तयारीही केली.
शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही भाजपच्या या आरोपांना थेट कृतीतून उत्तर दिले. त्यांनी थेट जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजचे कोविड सेंटर व गोदावरी मेडिकल कॉलेजच्या कोविड सेंटर भेट देवून तेथील रूग्णांशी संवाद साधून आपल्या कृतीतून त्यांनी भाजप नेत्यांना उत्तरही दिले. या शिवाय त्यांनी जिल्ह्यातील इतर कोविड केंद्रानाही भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. शिवाय शासनाकडून कोविड रूग्णांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.