अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही सुशांतने आत्महत्या का केली यामागचे ठोस कारण मुंबई पोलिसांना सापडले नाही आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेक दिग्गज कलाकारांची कसून चौकशी केली होती. मात्र आता या तपासात पोलिसांनी सलमान खानच्या एक्स मॅनेजरची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसिद्ध टॅलेंड मॅनेजमेंटची हेड असणारी रेश्मा शेट्टी हिची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली. रेश्मा अभिनेता सलमान खानची एक्स-मॅनेजर आहे. सलमान खानसाठी तिने काही वर्ष काम पाहिले होते. मुंबई पोलिसांनी जवळपास 5 तास रेश्माची चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये असणाऱ्या वादाबाबत आणि बॉयकॉटबाबत ही चौकशी करण्यात आली.
रेश्मा शेट्टीने अशी माहिती दिली की, ती सुशांतला केवळ दोन वेळा भेटली आहे. तिने असे स्पष्टीकरण दिले आहे की, सलमानने सुशांत सिंह राजपूतला इंडस्ट्रीने बॉयकॉट करावे याकरता दबाव टाकला या निव्वळ अफवा आहे. रेश्मा शेट्टीने सलमान खान बरोबरच अक्षय कुमारसाठी देखील टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या आठवड्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी सुशांत सिंग सोबत चित्रपट करण्याचा विचार करत होते. तारखांच्या गडबडींमुळे आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या चौकशीत सुशांतला चित्रपटातून काढून टाकण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, सुशांतचे पूर्ण लक्ष यशराज फिल्सच्या येणाऱ्या चित्रपटाकडे होते. सुशांतने दोन मोठ्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. संजय लीला भन्साळी यांच्या मते त्यांनी कधीही सुशांतला त्यांच्या चित्रपटातून ‘ड्रॉप’ केले नव्हते. काल देखील पोलिसांकडून सुशांतच्या बहिणीला जवाबसाठी बोलविण्यात आले होते.