मुंबई : देशात गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यात देखील दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला, मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी पोलीस कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
अशा आशयाचे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले असून, पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाड यांच्याविरोधात कारवाई करा, अशी मागणी त्यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्याचसोबत त्यांनी, केंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
तसेच पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या अधिकाऱ्याची अधिक सखोल चौकशी करून, ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी मागणीसुद्धा त्यांनी पत्रात केली आहे.
यावेळी त्यांनी, राज्यात आज जो रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा जाणवत आहे, याला घेऊन केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर घाणेरडे राजकारण करत आहे, ते निषेधार्ह आहे, असे म्हटले आहे.
रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कोटींचा रेमडेसिवीरचा साठा कुठून येतो कुठून? याचा काळा बाजार करणारे हे लोक कोण आहेत? यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का?
पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा.#BJPHoardingRemdesivir pic.twitter.com/hdsvYmdZAh
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 18, 2021