कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट, डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.
अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या मनोमिलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे दोन्ही राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. अविनाश मोहिते यांनी परवाच तर डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी काल अर्ज भरल्याने मनोमिलन होते की नाही याबात साशंकता आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी अर्ज भरत आपला अजेंडा काय हे स्पष्ट केले आहे. कारखान्यात विरोध संपण्याऐवजी विरोधक संपवण्याच्या गलिच्छ प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी डॉ. सुरेश भोसलेंच्या गटावर केला आहे.
ऊसतोड होत नाही, त्यात कॉन्ट्रॅक्टरच कुणाचा ऊस तोडायचा हे ठरवत आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर हे सर्व प्रकार बंद होणार हे निश्चित आहे. भगीरथ योजननेच्या बाबतीत योजनेवर कर्ज काढून नफ्यात दाखवण्याचा निंदनीय प्रकार चालू आहे. कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात गेलेल्या स्कीम्स दुरुस्त करणं आम्ही आमची जबाबदारी समजतो. कामगारांचे अत्यंत हाल आहेत. ४ आणि ५ हजारांवर कामगार २० वर्षांपासून काम करत आहेत आणि कामगारांना शासनाकडून मिळालेला फरक देखील अजून मिळालेला नाही त्यामुळे कामगारांना न्याय देण्याचा १००% प्रयत्न आम्ही करणार आहोत असे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले आहे.
कृष्णा काठावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर खलबत चालू होतं. आज मात्र विरोधी गटातील संस्थापक पॅनलच्या वतीने कारखान्याचे नेते अविनाश मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजूनही अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात समेट होतो न होतो तेच अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अविनाश मोहिते यांनी दुपारी उमेदवारी अर्ज भरला आहे.