पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आता प्रभागनिहाय ‘लोकसहभागातून’ कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित सहकार्याने महाराष्ट्रातील पहिलाच असा प्रयोग शहरात राबवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची सुरूवात भोसरी विधानसभा मतदार संघातून होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या सध्यस्थितीला ८ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. शहरातील आरोग्य व्यवस्थापनाची क्षमता पाहता आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडू लागले आहेत. तसेच, कोरोना सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरही मोठा ताण आहे. परिणामी, रुग्णांची सेवा सुश्रृषा आणि सुविधांवरुन समाजात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत महापालिका वैद्यकीय विभाग, आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, महापालिका आयुक्त आणि आमदार महेश लांडगे यांच्यात बुधवारी बैठक घेण्यात आली.
आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ ही संकल्पना पुढे आणली. त्याअंतर्गत आता प्रत्येक प्रभागातील आजी-माजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोरोनाच्या संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी कोविड सेंटरमध्ये शक्य ती समाजसेवा बजावण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेता येईल. स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था, संघटनांच्या सहभागाने प्रभावीपणे कोरोनाचा मुकाबला करता येईल. कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा आणि मानसिक आधार देता येईल. अशी भूमिका स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडली.
संपूर्ण शहरात एकूण ३२ प्रभाग आहेत. त्यापैकी भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण १२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येईल. त्या प्रभागातील खासगी शाळा- महाविद्यालयांची जागा त्यासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच, प्रभागातील विद्यमान चार नगरसेवक आणि त्यांच्या मदतीने आठ ते दहा स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे