पिंपरी चिंचवड : देशात सगळीकडेच करोना विषाणूने भयंकर हाहाकार माजवला आहे. याला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरदेखील अपवाद नाही. शहरात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे, तर बाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण पडला असून, आरोग्य सोयी-सुविधांची प्रचंड प्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासोबतच पिंपरी – चिंचवडमध्ये देखील रेमिडीसिवर इंजेक्शन्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे करोना बाधित रुग्णांचे हाल होत असून, याचा मनस्ताप त्या रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागता आहे. मात्र लवकरच हे चित्र बदलण्याची आशा दिसू लागली आहे.
याचे कारण म्हणेज, आज पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप प्रशासनाने कोविड रुग्णालयांमध्ये केले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील कोविड रुग्णालयांचा देखील समावेश आहे. याचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढले गेले असून, त्याच्या प्रती संबंधित यंत्रणांना दिल्या गेल्या आहेत.
भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही दिलासादायक बातमी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना दिली आहे. यावेळी त्यांनी, पिंपरी-चिंचवडमधील विविध कोविड रुग्णालयांनी संबंधित औषध पुरवठादारांकडून, निर्देशित केलेल्या संख्येनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार प्राप्त करून घ्यावेत. अशा प्रकारचा परिपत्रकातला माहितीचा आशय देखील लिहिला आहे.
तसेच कोणत्याही प्रकारची दिरंगाई, कसूर आणि टाळाटाळ होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील खाजगी व महानगरपालिकेच्या एकूण 50 कोविड रुग्णालयांतील 1378 बेड्साठी सध्या 868 इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. शहरातील रुग्णसंख्या पाहता आणखी रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करावी लागणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन पाठपुरावा करत आहे, असे देखील त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.