कोल्हापुर: कोल्हापुरात आता गोकुळ जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संघर्ष बघायला मिळणार आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभ येथील जैन सांस्कृतिक भवनात झाला. त्या वेळी पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघामधील ( गोकुळ ) महाडिक व कंपनीची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. फक्त एकवेळ सत्ता द्या, दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये जादा दर देऊन दाखवू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत दिले.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यायसह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळवर पंचवीस तीस वर्षे महाडिकांची सत्ता आहे. मल्टिस्टेटच्या माध्यमातून गोकुळ प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडला. आता त्यांच्या एकहाती सत्तेवर निर्णायक घाव घालण्याची संधी आली असून 2 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन करा. मल्टिस्टेट, वासाचे दूध, पशुखाद्य असे अनेक विषय आहेत. गोकुळ सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेणघाण व धारा काढणाऱ्यांचा संघ असून त्याच्यावर मालकी दूध उत्पादकांची राहण्यासाठी आमचा लढा आहे असे देखील यावेळी ते म्हटले.
आपण आता सत्त्ता पालट करण्यासाठी शपथ घेतली आहे पॅनेल टू पॅनेलची. त्यामुळे ठरावधारकांनी फक्त कपबशी चिन्ह बघायचे व शिक्का मारायचा. इकडे तिकडे बघू नका, घोटाळा होईल. मतपत्रिकेत पै पाहुणे नातेवाइकांना हुडकू नका. कपबशीचा एकच ध्यास घ्या व शिक्का मारा, असे आवाहनही त्यांनी केले. दूध उत्पादकांच्या हाती सत्ता येण्यासाठी हा लढा उभारला गेला आहे, ही लढाई सत्तेसाठी नाही. दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. पंचवीस वर्षे एक हातातील सत्ता उत्पादकांच्या हातात देण्यासाठीची लढाई आहे. पाच वर्षे आमच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.