नवी दिल्ली : देशात दिवसाला सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या तब्ब्ल २ लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा तुटवडा जाणवत असून, परिणामी करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा, रुग्णवाहिकांचा, ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील दुसरीकडे करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातल्या या परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून, यात मात्र देशातल्या सामान्य नागरिकांचा हकनाक बळी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, देशातल्या या परिस्थितीला काही प्रमाणात राजकीय नेतेदेखील जबाबदार असल्याचे विधान केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले असून, सोनिया गांधी यांच्या विधानाचा त्यांनी हवाला दिला आहे.
“सोनिया गांधी बरोबर म्हणतात की, करोना साथीच्या प्रसारासाठी आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी आहोत. आता करोना नव्या रुपात प्रकट झाला आहे आणि देशात भयावह स्थिती निर्माण होत चालली आहे. इतकंच नाही, तर कर्फ्यू आणि लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीप्रमाणेच राज्यांसोबत चर्चा करायला हवी” असं अशोक गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अब कोरोना का नया रूप प्रकट हुआ है और देश में भयावह स्थिति बनती जा रही है एवं लॉकडाउन और कर्फ्यू लगाने जैसे सख्त फैसले करने पड़ रहे हैं। प्रधानमंत्री जी को पूर्व की तरह राज्यों से विस्तार से चर्चा करनी चाहिए।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 16, 2021
शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.