मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात करोना प्रतिबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.
दुसरीकडे पुण्यात देखील इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांच्या जाणवत असलेल्या कमतरतेमुळे, आरोग्य प्रशासनाचा गोंधळ उडालेला आहे. यावर काल, पुण्यातील करोना स्थिती आणि संबंधित उपाययोजनांचा आढाव घेण्यासाठीची बैठक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर अधिकाऱ्यांच्यात पार पडली.
यावेळी जावडेकरांनी, केंद्र राज्याला सर्वतोपरी मदत करत असल्याचा पुनरुच्चार केला, तसेच आतापर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख वापरले असून, उर्वरित व्हॅक्सिन्स शिल्लक आहेत. मात्र या शिल्लक लसींचे योग्य वाटप झाले पाहिजे असे सांगत, ही आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही. आम्ही राजकारणाचे उत्तर जरुर वेगळं देऊ असे मत व्यक्त केले होते.
तसेच करोना लसींच्या पुरवठ्यावरून सुरु असलेल्या राजकारणावरही भाष्य करत, त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर यांवरून अनेक गंभीर आरोप केले होते.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी यांनी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे,” असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना टोला लगावला आहे. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काल राज्यातल्या करोना परीस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. ज्यात लॉकडाऊन, आरोग्य आणि इतर प्रशासकीय उपाययोजना, तसेच निर्बंधांबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली मतं मांडली. यात जवळजवळ एकमताने राज्यात काही कालावधीसाठी लॉक डाऊन लागू करण्याच्या विचारावर शिक्कमोर्तब झाल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.