कोरोनाने महाराष्ट्राला विळखा घातला असून कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल . विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली यावेळी ते बोलत होते.
शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत.