नागपूर : मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता 15 दिवसातच त्यांची ही बदली रद्द करण्यात आली आहे.
आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.तुकाराम मुंढे यांची आता कोठे नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.
बदलीच्या आदेशानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत नागपूरकरांचे आभार मानले आहेत. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही, असे ते म्हणाले.
जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…! अलविदा…!, असे म्हणत त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले.