पुणे : देशात लसीकरणावरून आणि लसींच्या किमतींवरून राजकरण सुरु असतानाच आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने, आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. आता ती ३०० रुपयांना मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, याआधी सिरम इन्स्टिट्युटने लसीचे नवे दर जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रति डोस अशी किंमत, तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपयांना लस असणार अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आता सिरमने नवे दर जाहीर केले असून या नव्या दरानुसार, राज्य सरकारांना ही लस ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांना या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे ६०० रुपयेच मोजावे लागणार आहेत.
As a philanthropic gesture on behalf of @SerumInstIndia, I hereby reduce the price to the states from Rs.400 to Rs.300 per dose, effective immediately; this will save thousands of crores of state funds going forward. This will enable more vaccinations and save countless lives.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 28, 2021
दुसरीकडे, देशात १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं देखील लसीकरण करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय केंद्र सरकारनं थोड्याच दिवसांपूर्वी घेतला.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर देशातल्या अनेक राज्य सरकारांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार देखील राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.