मुंबई : देशभरात करोनाची साथ वेगाने फैलावत असून, दुसऱ्या लाटेत अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय, कोरोना लसी, बेड्सची संख्या, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी देखील रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातदेखील हीच परिस्थिती असून, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वेमार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल का, असे केंद्र सरकारला सुचवले होते.
या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवण्याचा निर्णय घेतला होता. अखेर कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आता विशाखापट्टणमला पोहोचली असून, मिळालेल्या माहितीनुसार, १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली असून, प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे. परंतु प्रोटोकॉलनुसार, टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी, वजन करण्यासाठी तसेच सुरक्षेची खात्री करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी २०-२४ तास लागू शकतात. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
OXYGEN EXPRESS arrived at RINL , VSP site to get Liquid Medical Oxygen for covid patients in Maharashtra#RINLSavingLives#OxygenExpress @SteelMinIndia @prasarbharati @COVIDNewsByMIB @PMOIndia @PIB_India pic.twitter.com/UekJ2EjSU5
— RINL (@RINL_VSP) April 22, 2021