नकुल नाडकर्णी
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिभा दुध डेअरीने अनेक शेतकऱ्यांची देणी थकवली असुन प्रतिभा डेअरीच्या माध्यमातुन दुध संकलनाच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यानंतर पारकर यांनी पहिल्याच सभेत आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पारकर यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.या मुद्यावरुन नियोजन समितीच्या बैठकीत संदेश पारकर व खासदार नारायण राणे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली.
“जिल्हा दुध संघ, कणकवलीतील शासकीय डेअरी तसेच गोकुळसारखी नावाजलेली दुध संस्था वगळुन प्रतिभा दुध डेअरी जवळ जिल्ह्यातील अनेक दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध विक्री केली. मात्र या शेतकऱ्यांचे पैसे अजुनही मिळाले नाही. शेतकऱ्यांचे पैसे हे केव्हा देणार व या सगळ्या फसवणुकीमागे कोण आहे? याचा शोध घ्यायला पाहिजे”. सिंधुदुर्ग शिवसेना नेते संदेश पारकर
याबाबत पारकर यांनी जिल्याचे पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली. तसेच शेतकऱ्यांची थकीत रक्कम शासनाकडून मिळवून देण्याची मागणी केली आहे.
प्रतिभा डेअरीने सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून २०१७ पासून दूध खरेदी सुरु केली. सुरवातीचे ६ महिने खरेदी केलेल्या दुधाची रक्कम देण्यात आली. नंतर मात्र दुधाची रक्कम देण्यास डेअरी कडून टाळाटाळ होऊ लागली. नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडे दूध देणे बंद केले आहे. याचा परिणाम संघाच्या दूध उत्पादनावर झाला. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या गाई म्हैशी विकून बँकांचे हप्ते दिले आहेत. हप्ते न भरल्याने दूध वाहतूक दरांची वाहने देखील बँकांनी जप्त केली आहेत. प्रतिभा दूध कंपनीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच काही वैयक्तिक ठेवीचे मिळून २ कोटी ६० लाख एवढी रक्कम थकीत आहे.