पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ‘मदार’ माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. त्याद्वारे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांना कोंडीत पकडण्याची रणनिती राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून आखली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चबांधणी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही महापालिका कारभारात बारकाईने लक्ष घातले असून, आपल्या निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून पालिकेचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दोन आमदार आहेत. आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप ही जोडगोळी भाजपाची जमेची बाजू आहे. किंबहूना या दोघांच्या भरोशावरच भाजपा महापालिकेवर पुन्हा ‘कमळ’ फुलवण्याचा प्रयत्न करणार आहे.
ही बाब लक्षात घेवून लांडगे आणि जगताप यांना तोडीस-तोड स्थानिक विरोधक महापालिका रणसंग्रामामध्ये उतरवण्याची रणनिती आखली जात आहे.
‘त्या’ पराभवाचा वचपा विलास लांडे काढणार ?
२०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा आमदार महेश लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत केले आहे. या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी लांडे कामाला लागले आहेत. नवोदित आणि जुन्यांचा मेळ घालून लांडे यांनी भोसरीत वातावरण निर्मिती केली आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त समर्थक नगरसेवक निवडूण आणणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत लांडे पक्षसंघटनेवर पकड मजबूत करणार, यात तिळमात्र शंका नाही.
‘या’ साठी पक्ष संघटनेवर हवी पकड !
पक्ष संघटनेत काम करताना पक्षाचा शहर पातळीवर प्रमुख असलेल्या नेत्याला महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त तिकीट वाटपात अधिकार प्राप्त होतात. किंबहूना, राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार पक्षाच्या स्थानिक नेतृत्त्वाला विचारात घेवूनच तिकीट वाटप करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे शहराध्यक्ष अथवा तत्सम पदाची सूत्रे आता माजी आमदार विलास लांडे आपल्या ताब्यात घेतील, अशी चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विलास लांडे यांना सोबत घेवून महापालिका भवनात भेट दिली. त्यामुळे लांडे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची सूत्रे सोपवली जाणार, असे संकेत आहेत.
Read Also
एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवारांची मंजुरी ?https://t.co/CqeyQqLymr#EknathKhadase #ncp #SharadPawar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 17, 2020