अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात अनेक पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यांचे पाहणी दौरे करत आहेत. त्यातच आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. भाजपने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं, असं आव्हान ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ दिलं आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायची, याचे आकलन होत नाही. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचादेखील आग्रह असतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
आम्ही अनेक वर्ष राज्य कारभार केला आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. आमची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे.
शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाने हसन मुश्रीफांची गाडी रोखली
दौऱ्यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आज शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाला तोंड द्यावे लागले. या शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
गेल्या वर्षी कोल्हापूरला महापूर आला तेव्हा सहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस आले होते. ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सांगली-कोल्हापुरात त्यांच्याविरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली, असा चिमटा मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांवर काढला.
दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येत्या एक-दोन दिवसांत आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झाली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पॅकेजसंदर्भात घोषणा होऊ शकते.
Read Also :
खडसे एकटेच, आमचा एकही आमदार एकनाथ त्यांच्या संपर्कात नाही : प्रवीण दरेकरhttps://t.co/4LyUkb5zII @mipravindarekar @EknathGKhadse @Jayant_R_Patil
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 22, 2020