चाकण : राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. डॉक्टरांना जीवाचे मोल असते. खासदार सुजय विखे डॉक्टर आहेत, मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी कोठे लस मिळते ते सांगावे, याचा फायदा सर्वांनाच होईल, असा खोचक सवाल विचारत चाकणकर यानी विखेंवर निशाणा साधला.
राज्यात पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे व त्यावरिल वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचे धोरण आखले. परंतू, अपूऱ्या लस पुरवठ्या आणि रेमडेसिवीर अभावी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की डॉक्टरांवर ओढवली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ होत आहे.
दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर तुडवडा आहे. लोक वणवण भटकत आहेत. अशातच भाजपच्या नेते रेमडेसिवीर अनधिकृतपणे वापर करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. डॉ. सुजय विखे हे नगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार असून ते एक डॉक्टर आहेत. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे. डॉक्टरांना जीवाचे मोल असते.
त्यामुळे, मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी कोठे लस मिळते ते सांगावे, याचा फायदा सर्वांनाच होईल, आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिवीर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.
सुजय विखे यांनी २२ एप्रिलला थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही.
त्यानंतर, त्यांनी २४ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले होते.