कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी कारखान्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र समोर आले आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रेठरे बुद्रुक येथे ७८ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी ३०५ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. आज दुपार पासून बाजार समिती सभागृहामध्ये अर्जांची छाननी केली जाणार आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि त्यांच्या विरोधात संस्थापक पॅनल, अविनाश भोसले गट , रयत क्रांती पॅनल डॉ. इंद्रजित मोहिते गट अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उद्या ३ जून रोजी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे मनोमिलन होणार कि नाही हे जाहीर होणार आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वडगाव हवेली – दुशेरे गटातील तीन जागांसाठी ५१ अर्ज दाखल झाले आहेत. काले कार्वे गटातील तीन जागासाठी ४३ अर्ज, नेर्ले – तांबवे गटातील तीन जागासाठी 33 अर्ज, रेठरे हरणाक्ष – बोरगाव गटातील तीन जागासाठी ५0 अर्ज दाखल झाले आहेत. येडेमच्छिंद्र – वांगी गटातील दोन जागांसाठी २४ अर्ज , रेठरे बुद्रुक – शेणोली गटातील दोन जागासाठी ३0 अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी ३३ अर्ज, अनुसूचित जाती – जमाती राखीव एक जागेसाठी १७ अर्ज, इतर मागास प्रवर्ग राखीव एक जागेसाठी १२ अर्ज, विजा – भज – विमाप्र राखीव एक जागेसाठी १२ अश्या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी तब्ब्ल ३०५ अर्ज दाखल झाले आहेत.