जळगांव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील.
जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्षबांधणी संदर्भात ही रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या आजी माजी दहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याबाबत फडणवीस रक्षा खडसे यांच्याशी चर्चा करु शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागूल्या आहेत.
एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफानी हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला अतोनात त्रास दिला, अक्षरश: पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असा आरोप त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केला होता.