परभणी जिल्ह्यातील पाच आमदार व दोन खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये खर्च करून परभणी जिल्ह्यासाठी १६ नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.१७) दिली.
परभणी जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. रुग्णवाहिका नसल्याने गावकुसावरील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचविणे आवघड होत असते. त्यामुळे दोन खासदार व विधीमंडळाचे पाच आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करीत रुग्णवाहिका खरेदी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सर्व लोकप्रतिनिधीबरोबर चर्चा करतील. तातडीने निधी उपलब्ध होण्या संदर्भात तसेच पोर्टलच्या माध्यमातून त्या रुग्णवाहिका खरेदी करण्या संदर्भात निश्चीतच जलदगतीने प्रयत्न करतील असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे परभणीतील रहिवाशी असलेल्या व मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून नोकऱ्या करणाऱ्या डॉक्टरांना परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सेवा देण्याची संधी दिली जाणार आहे. 12 ते 14 डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास निश्चीतच कोरोना विरूध्दच्या या लढाईस मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.