मुंबई : बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळता कामा नये, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक असणारी घटना आहे. त्याचा तीव्र निषेध करीत आहोत. या गुन्ह्यातील आरोपी हा या आधी बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून, तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने हा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळता कामा नये, तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी, यासाठी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ॲट्रोसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार त्वरित आठ लाखांची मदत शासनाने द्यावी, मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी द्यावी, तसेच या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी केली.