पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातल्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी पंढरपुरात आपला तळ ठोकला असून, प्रचारसभांची रेलचेल निवडणुकीच्या मैदानात सुरु आहे.
आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात प्रचारसभा घेणार असून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटलांनी विरोधी पक्षावर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर ते यावर सत्ताधाऱ्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, त्यांच्या पंढरपुरात सहा सभा होणार असून, मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव, मंगळवेढा या ठिकाणी पहिल्या चार सभा होणार आहेत. नंतर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या निवासस्थानी भोजन करून, दुपारी २ वाजता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आणि 3 वाजता गादेगाव येथे प्रचार सभा घेणार आहेत. दौऱ्यातील शेवटची सभा दुपारी ४ वाजता पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मंदिर येथे पटांगणात होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.