पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील धुसफूस आता एकमेकांच्या औकातीवर येवून ठेपली आहे. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवर टीका करत आहे, थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं, अशी खोचक टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहे. मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राटासारखा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे
शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असे वक्तव्य करताना , लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.असे अमोल कोल्हे शिरूर येथे बोलले त्या बाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली . कलाकार आहात कलाकारच राहा उगाच राजकारणी बनण्याचे नाटक करू नका असा सल्लाही त्यांनी शेवटी खासदार अमोल कोल्हे याना दिला.
नेमका वाद काय?
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे.
पक्षश्रेष्ठी काही समज देणार का?
एकीकडे आघाडीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरकार टिकवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. त्यातच दुसरीकडे खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील धुसफूस आता एकमेकांच्या औकातीवर येवून ठेवली आहे. कारण आढाळराव पाटलांनी थेट अमोल कोल्हेची औकातच काढली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संबंधांना स्थानिक पातळीवर दरी निर्माण झाली आहे. त्यातच आता कार्यकर्त्यांमध्येही मोठी नाराजी निर्माण झाली आहे. यांच्यातील वादाची दरी अशीच वाढत गेली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार शिरूरच्या आजी-माजी खासदारांना काही समज देणार की?, अन्य मार्गाचा अवलंब करणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
- पवारांनी एनडीए’त यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं – रामदास आठवले
- “काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याची आठवण करून दिलेली बरी”; शिवसेना-राष्ट्रवादीच्या रस्सीखेचात काँग्रेसची एन्ट्री
- राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील
- भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार?, शंभुराज देसाई म्हणतात…