इंदापूर : शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला, असे म्हणत युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. ते इंदापुरात आयोजित युवक काँग्रेस मेळाव्यात बोलत होते. सत्यजीत तांबेच्या या टीकेला आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सत्यजित तांबे यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. तुमचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं, अशा शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती, अशी टीका देखील अंकिता पाटील यांनी केली.
हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्यांच्या राजकीय कारकिर्दीएवढे आपले वयदेखील नाही, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती. ज्येष्ठ नेत्याविषयी बोलताना त्यांनी राजकीय संकेत पाळणे आवश्यक होते, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.