मुंबई : मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक कलावंतांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मांडण्यात आलेल्या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी आश्वासन दिले.
गेल्या एक वर्षापासून या कोरोनाने संपूर्ण जगावर ताबा मिळवला कि काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कोरोनाने कुणाच्या घरातील आधार हिरावला तर कुणाचा रोजगार. कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागले आहे. महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस वाढणारे कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता परिस्थिती कधी स्थिरावेल?, असा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांनाच पडला आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका बसतोय तो ज्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राची लोककलेची संस्कृती जतन केली अशा लोककलावंतांना. या प्रत्येक कलाकारासमोर आता जगायचे तरी कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोककलावंतांची किमान रोजी रोटी चालू राहावी यासाठी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे देखिल पुढे सरसावले आहेत.
कलावंत कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत सापडली आहेत. सलग दोन वर्षे कोरोनामुळे नाट्यप्रयोग रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. कलावंतांची ही केविलवाणी दशा पाहून राज ठाकरे यांनी आज नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक कलावंतांशी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल?, या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे जाणून घेतल्यानंतर यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. शिवाय, दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली.
आमदार महेश लांडगेंची भूमिका.!
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी ठोस भुमिका घेतली आहे. शासनातर्फे अनेक घटकातील लोकांना मदत मिळत असताना, कलाकारांना सुद्धा मदत केलीच पाहिजे. तशी मागणी कोणी करत नसेल तर, मी स्वतः कलाकारांच्या समस्यांची मागणी करेन. जोपर्यंत कलाकारांच्या समस्या सोडवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत शासनदरबारी लढा करण्यास सर्व चित्रपटाशी संबंधित संघटनांच्या खांद्याला खांदा लावून शासन दरबारी मागणी लावून धरु. काही ठराविक चित्रपटातील लोकांची बैठक घेऊन, या सर्व समस्या लिहून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊ. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत लोककलावंतना न्याय मिळत नाही, तो पर्यंत हा लढा कायम चालू राहिल, अशी भुमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे.