कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित असतील. मात्र यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे भोगलं ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे. महाराष्ट्र, महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे त्यांचे काम करत राहिले आज मात्र पक्षप्रमुख म्हणून ते राजकीय भाष्य करतील आणि विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत.
शिवसैनिकासांठी दसरा मेळावा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचांरांचे धन घेण्याचा सोहळा असायचा. शिवसैनिक मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचारधन आणि उर्जा घेऊन निघायचे. दसरा मेळाव्यातून देशाला दिशा देणारा विचार मिळत असे. राष्ट्रीयत्व, राष्ट्रधर्म यावर शिवसैनिकांना मार्गदर्शन व्हायचं, असं अरविंद सावंत म्हणाले.
दसरा मेळाव्याला दरवर्षी लाखो शिवसैनिक उपस्थित राहायचे. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने कोट्यावधी जनतेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विचारधन पोहोचणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.