बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयात एकाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या दरम्यान तुपकर यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक मध्ये आल्याने अनर्थ टळला. हल्लेखोरासोबतच्या झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत मार बसला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या जनार्धन दगडू गाडेकर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कुऱ्हाडीसह अन्य एक हत्यारही जप्त केले आहे. आज सायंकाळी 5 ते 6 दरम्यान हा हल्ला झाला.
या हल्ल्यात तुपकर यांचे स्वीय सहाय्यक सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही इजा झाली नाही. पडघान यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.