मुंबई : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशाराही राज्यमंत्री बच्चू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी मोदींना विचारला.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा कवडीमोल भावात विकला होता. आता कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.