मंगळवेढा: पंढरपुरात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. भगीरथ भालके आणि समाधान अवताडे यांच्यात काटे कि टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस भारतीय जनता पक्षाचे समाधान अवताडे यांचा निवडणुकीत विजय झाला. विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक पंढरपूरच्या निवडणुकीत किंगमेकर च्या भूमिकेत सर्वांच्या पुढे आले. कालच मंगळवेढा नगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांनी बैठक आयोजित केलेली होती.
पहिल्याच नगरपालिकेच्या बैठकीला नगराध्यक्ष, पक्षनेते, काही नगरसेवक व मुख्याधिकारी अनुपस्थित राहिले होते. त्यावरून बैठकीत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे सूतोवाच आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले. यावेळी आमदार परिचारकांचा संतापाचा पारा चढलेला सगळ्यांनी बघितला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या अध्यादेशाची आठवण काढत भगीरथ भालके आणि भालके समर्थकांनी आमदार समाधान अवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतलेल्या बैठकीची सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच खिल्ली उडवली आहे.
कोरोना संकटाच्या काळात मंगळवेढा नगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेल्या बैठकीबाबत सरकारच्या निर्देशाचे पालन गेले नसल्याचे म्हणत आरोप केला गेला आहे. ११ मार्च २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकाढलेल्या आदेशानुसार संसद व विधिमंडळ सदस्य अन्य प्रशासकीय सदस्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ शकत नाही अथवा त्यांना सूचना देखील करू शकत नाही. यामुळे पंढरीच्या दोन नेत्यांच्या समर्थकांमधील आरोप प्रत्यारोपांमध्ये मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या विकासाला खीळ बसणार कि काय याची चर्चा संपूर्ण पंढरपुरात रंगली आहे.