कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून जिम बंद आहेत. एक एक गोष्ट सुरू होत आहे, मात्र सरकारने जिम उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिम तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र… pic.twitter.com/kbSDY4sk1V
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 13, 2020
आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही?, असे फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे.
फडणवीसांना पत्रात म्हटले की, केश कर्तनालये ही अन्य राज्यांमध्ये लवकर उघडण्यात आली, महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भात होणार्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय करीत आपल्याला आता हळूहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही.