संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर देखील आज ट्विट केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले आहे.ही मुलाखत धक्कादायक असेल असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र संजय राऊतांच्या या शब्दांवरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आपल्याच मालकाला, वाह क्या बात असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
राऊत म्हणतात..
एक शरद!
सगळे गारद!!उद्धवजी पण गारद ???
आपल्याच मालकाला??!!
वाह! वाह! क्या बात!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 8, 2020
दरम्यान, ‘शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,’ असं राऊत यांनी म्हटलं होतं.