मुंबई : दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन आल्यामुळे भाजप खासदार सुजय विखे-पाटील वादात सापडले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली असल्यामुळे, त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना, सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला त्यांनी विखे पाटलांना लगावला आहे.
तसेच, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी केलेला व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसून येत आहे, तर या संदर्भात समाज माध्यमांवर नागरिकांच्या वेगळया वेगळया प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. खा. सुजय विखे यांनी विमानातून इंजेक्शन आणल्या वरून चांगलेच राजकारण पेटले आहे.