IMPIMP

२०२४ च्या लोकसभेत भाजपाला मिळतील ४०० हून अधिक जागा – चंद्रकांत पाटील

सिंधुदुर्ग  – २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत देशाची एकहाती सत्ता मिळवली होती. दरम्यानच्या काळात भाजपाचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकित केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्या विजयाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवला होता.