कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक माळी, कोरेगावचे संजय सुद्रिक व महाबळेशवरचे जे.पी. शिंदे सहायक निवडूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ रद्द करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रशासनाला केली आहे. कारखान्याची निवडणूक रद्द करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. निवेदनात म्हटले आहे की आपण सर्व जण सध्या कोरोनाच्या संकटासोबत लढा देत आहोत. अश्या संकटकाळात निवडणूक होणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
साधारण मागील वर्षी देखील कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या साताऱ्यात लॉकडाउन देखील सुरु करण्यात आलेला आहे. अश्यातच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक लागली म्हणजे प्रचार सभा होणार,मेळावे भरणार. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कोरोनाची साथ वाढणार. त्यामुळे आम्ही निवडणूक घेण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ही निवडणूक तात्काळ रद्द करावी अशी मागणी साजिद मुल्ला यांनी केली आहे.