मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत ५५ ते ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून, अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात, १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी काल रात्री ८ वाजल्यापासून राज्यात सुरु झाली.
या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आजपासून पुढचे १५ दिवस आणि रात्र राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
तसेच त्यांनी यावेळेस प्रशासनाला सूचना देताना, कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला आपल्याला परवडणार नाही, असे देखील सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
यावेळी त्यांनी, जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत, मात्र त्या ठिकाणी नियम मोडले जात असतील किंवा विनाकारण गर्दी केली जात असेल, तर त्या सुविधा बंद कराव्यात, अशा स्पष्ट शब्दात स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी देखील आरोग्य यंत्रणांना काही सूचना केल्या आहेत. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा, हे सांगतानाच त्यांनी ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे देखील सांगितले आहे. याचबरोबर एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आपण उभारलेल्या जम्बो सुविधा सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यायच्या आणि सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यायच्या साचून देखील टास्क फोर्स कडून देण्यात आल्या आहेत.