मुंबई : सध्या राज्यात करोनाचा प्रचंड वेगाने फैलाव होत असून, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात बेड्स, ऑक्सिजन सोबतच रेमेडीसीवर या करोना रोगावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शन्सचा देखील तुटवडा जाणवत असून, यावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलचं तापलेलं आहे.
पार्ले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी, फडणवीसांना अटक करा अशी मागणी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी सीएस साहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे’..अशा शब्दात चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी आदी नेत्यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात मध्यरात्री धाव घेतली.
यावरून आता राज्यात राजकारण रंगू लागले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी
सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 19, 2021