महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे.सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आता महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 89 वर्षीय शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.
दरम्यान, नुकतंच राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची वाढती बाधा आणि राजकीय कार्यक्रमांमुळे आलेले संपर्क यामुळे मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी आठडाभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.