सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून काही प्रमाणात शिथिल होत आहेत. याप्रमाणे नागरिकांना आजपासून जीवनाश्यक वस्तू खरेदीला अधिक सूट मिळणार आहे. दुकानं सुरु करण्याच्या वेळेतही बदल करत आज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. मात्र सोमवारपासून दुकानांसाठी सकाळी 8 ते 12 पर्यंतचीच वेळ असणार आहे.