मुंबई: एक खासदार, 29 नगरसेवक आणि दोन आमदार असलेल्या एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरची सध्या चर्चा सुरू आहे. एमआयएमला भाजपची ब टिम असल्याची सातत्याने टीका केली जात असल्याने आता या पक्षाने चक्क राष्ट्रवादीला युती करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे राज्यभरात या गोष्टीची चर्चा सध्या रंगली आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युती करण्याचे संकेत दिले आहे. ते म्हणाले की, आम्हाला नेहमी भाजपची ब टिम म्हणून बोललं जातं. त्यामुळे आम्ही भाजपची ब टीम नसल्याचे खरं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याचं खुलं आवाहन देत आहोत. तेव्हा तरी आमच्यावरील टीका कमी होईल.
एमआयएमनं राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आम्ही पाहत आहोत की ते सत्तेसाठी काय करणार आहेत. तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे. त्याचा परिणाम आहे का पाहूयात. एमआयएम जर महाविकास आघाडीसोबत जात असेल तर आम्हाला काही फरकत पडत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतातील तसेच महाराष्ट्रातील जनता आमच्या सोबत आहे. लोकं नरेंद्र मोदी यांना पाहून मतदान करणार आहे. त्यामुळे ते सर्वजण एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. त्यामुळेच पाहायचं आहे की शिवसेना आणि एमआयएम कशाप्रकारे सोबत येतात. असंही त्यांनी म्हटलं आहे.