कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्या कुटूंबियावर भाजपाचे विधान परिषद वरील आमदार गोपीचंद पडळकर मागील काही दिवसापासून आग ओकत असल्याने चांगलेच चर्चेत आहेत. गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने जहरी टीका करत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशा इशारा मुश्रीफ यांनी दिलाय. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘शरद पवार यांना बदनाम करण्याची सुपारीच आमदार पडळकरांना देण्यात आली आहे. त्यांचा बोलविता धनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांचीच पडळकरांना फूस आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव खपवून घेतला जाणार नाही,’ असं हसन मुश्रीफ म्हणाले.
पडळकरांची शरद पवारांवर टीका
गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.