नवी दिल्ली : देशभरात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. तसेच १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने, देशातील १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र देशभरात लसीकरणावरून, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून आणि लसींच्या किंमतीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात देखील १ मे पासून १८ ते ४४ वर्षांपुढील सर्वांचं मोफत लसीकरण होणार असल्याचा निर्णय जाहीर केला गेला आहे, मात्र लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे, लगेच १ मे पासून लसीकरणास सुरुवात होणार नसल्याचं देखील सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात आता सिरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसींसोबत लवकरच रशियाची स्पुटनिक व्ही लस देखील लसीकरणासाठी उपल्बध होणार आहे. आजच रशियातून या लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे देशभरातल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भारतात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे.
The first lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad#COVID19 pic.twitter.com/uMW0AtM2JD
— ANI (@ANI) May 1, 2021