मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले.
मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.
नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २७७४ पर्यंत पोहचली आहे.तर मृतांची संख्या ४५ झाली आहे. तर १७३३ जण कोरोनामुक्त झाले आहे.पण कोरोना बाधितांची झपाट्यांनं वाढणारी संख्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. मिशन बिगीन अगेन सुरू होण्यापूर्वी नागपुर शहरात ४०० च्या जवळपास कोविड रुग्णसंख्या होती. मात्र १६ जुलैपर्यंत ती २१००च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांनानियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही.