मुंबई: ‘शेअर बाजाराच्या वर-खाली होण्यावर ज्या देशाची अर्थव्यवस्था सुरू आहे त्या देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असते. गुपकार गँग सर्वच क्षेत्रात असली तरी सहकार क्षेत्राचा नंबर त्यात शेवटचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही. अमित शहा (amit shah) हे सहकार चळवळीतलेच कार्यकर्ते आहेत. नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे? असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.
गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सहकार कायदे हे राज्य सरकारने केले आहे, त्यात केंद्राला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही’ असं मत व्यक्त केलं आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून सेनेनं आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
‘गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे अनेकांच्या मनात विचारांचे तरंग निर्माण झाले आहेत. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने या क्षेत्रावर आकाश कोसळेल असे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहा हे महाराष्ट्रासारख्या राज्यातील सहकार क्षेत्राच्या नाड्या आवळतील, अनेक प्रकरणे खणून काढतील, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहकारातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतील व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारची स्थापना ‘सहकारा’तून करतील असे जे बोलले जात आहे ते शहा यांची बदनामी करणारे आहे. राजकारणात व सहकारात बरे-वाईट, खरे-खोटे, नैतिक-अनैतिक असे काही भेदभाव सध्या उरले नाहीत. सर्व काही सोयीनुसार घडत असते’ असा टोला सेनेनं लगावला.
‘ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव लोकसभा निवडणुकीत भाजपने केला. त्याच शिंदे महाराजांना भाजपने आता मोठ्या सन्मानाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. कश्मीर खोऱ्यातील ‘गुपकार’ गँगला ३७० कलम लावल्यानंतर तुरुंगात टाकले होते. त्याच गुपकार गँगशी दिल्लीत पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली. सहकार क्षेत्रात एखादी गुपकार गँग असलीच तर त्यांच्याशीही चर्चा होईल. कारण राजकारणात शेवटी सगळे घोडे बारा टकेच असतात’ असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला.