अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तर दुसरीकडे मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
बलात्कराच्या आरोपानंतर विरोधकांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे.
याप्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे, असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर देखील असेच आरोप झाले होते. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे, असे ते म्हणाले.