बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळल्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, पोलिसांना मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.
चिक्कामगलुरुच्या कडुर येथील रेल्वे रुळावर एसएल धर्मगौडा यांचा मृतदेह मिळाला आहे. तसेच त्याठिकाणी पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडली आहे. कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे धर्मगौडा मागील काही दिवसात चर्चेत आले होते.
Karnataka: Body of SL Dharmegowda, Deputy Speaker of State Legislative Council was found on a railway track near Kadur in Chikkamagaluru. A suicide note has been recovered.
— ANI (@ANI) December 29, 2020
विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एसएल धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते एक शांत आणि सभ्य नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झालं आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांनी दुःख व्यक्त केले.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी सभापतींच्या अनुपस्थितीत बेकायदा पद्धतीने एसएल धर्मगौडा यांनी सभागृहाचे कामकाज स्वतःच्या अध्यक्षतेखाली चालवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात त्यांना धक्काबुक्की केली होती. 15 डिसेंबरला गोरक्षा कायद्यावरुन झालेल्या या राड्यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले होते.