कोल्हापूर – राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सत्र सुरुच आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे यांनी भाजपवर सर्जिकल स्ट्राईक करत जळगाव मध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु केले. यांच्या पाठोपाठच आता आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला राजीव आवळेंनी सुरुंग लावला होता.