कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक Krishna sahakari Sugar Factory अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने सत्ताधारी गट आणि विरोधी गटातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज गर्दी केल्याचे दिसून आले आहे.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. कृष्णा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन आणि संस्थापक पॅनलचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. कारखान्याच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत यावेळी सखोल चर्चा घडून आलेली आहे. अविनाश गरज पडेल तिथे मी स्वतः वयक्तिक मदत करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची चर्चा कृष्णा काठी रंगली आहे. कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास तयार राहा असे देखील पवारांनी सांगितल्याने आता अविनाश मोहिते यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सहकार पॅनलला शह देण्यासाठी विरोधी अविनाश मोहिते यांच्या नेत्तृत्वाखाली संस्थापक पॅनल आणि डॉ. इंद्रिजीत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनल यांनी शड्डू ठोकले आहेत. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते एकत्र आल्यास डॉ. सुरेश भोसले यांचा सहकार पॅनल अडचणीत येऊ शकतो. मात्र अजूनही दोन्ही मोहितेंचे मनोमिलन झालेले नाही. तडजोड न झाल्यास संघर्ष करण्यास तयार राहा आणि गरज लागेल तिथे मी आहेच असा विश्वास अजित पवारांनी दिल्यामुळे आता अविनाश मोहिते मनोमिलनाच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.