नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पाच नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि इतर नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
“शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवण्याचे सामर्थ्य राखतो. मात्र राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेमंडळी आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत” अशा शब्दांत शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.
“लोकांनी या विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाकारलं. शेतकऱ्यांनीही त्यांना दूर केलं. अशा परिस्थितीत या राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. कारण शेतकऱ्यांच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत. सर्व स्तरातून नाकारण्यात आलेले लोक आता शेतकऱ्यांचे हितचिंतक बनू पाहत आहेत. त्यांचा ढोंगीपणा आता लोकांनाही कळून चुकला आहे” असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.