पुणे : विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीकडून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ‘फोकस’ केलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघात आंबेगाव तालुका ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढराव पाटील हे दोन राजकारणापलिकडील दोस्त आता आगामी निवडणुकीत खासदार कोण होणार? हे ठरवणार आहेत.
विशेष म्हणजे, हे दोन्ही नेते आंबेगाव तालुक्यातील असतानाच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम रिंगणात उतरण्याची शक्यता असून तेसुद्धा आंबेबावचेच आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुका शिरुरच्या राजकारणात ‘केंद्रबिंदू’ ठरणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे या मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्यावर आगामी निवडणुकीत राज्यात पक्षाचा प्रचार प्रभावीपणे करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून दिलीप वळसे-पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांना संधी देण्यात येईल, असे सांगितले जाते.
भारतीय जनता पार्टीकडून या मतदार संघात मोठ्या प्रमाणात जोर-बैठका सुरू आहेत. पण, महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदार संघावर दावा केल्यास आढळराव-पाटील अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेतील. तसेच, दिलीप वळसे-पाटील आणि भाजपाची ताकद त्यांच्या पाठीशी राहिल्यास आढळराव यांचा विजय सोपा होईल, असा दावा केला जातो.
दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे पण अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. काही काळ त्यांनी शरद पवार यांच्यासाठी एकत्र काम केलेलं आहे. मात्र काही तात्विक मतभेदांमुळे आढळराव पाटील शिवसेनेसोबत गेले होते. त्यांनी तीन वेळा या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील यांच्या भोवती शिरूरचं राजकारण फिरण्यास सुरुवात झाली आहे.
भोसरीकरांच्या निर्णयाकडे लक्ष…
शिरूर लोकसभा मतदार संघातील २०१९ च्या निवडणुकीत भोसरी विधानसभेतून आढळराव पाटील यांना मताधिक्य आहे. या मतदार संघात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना शह देत आढळराव पाटील यांची सरशी ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून आमदार लांडगे शिरुर लोकसभेचे उमेदवार होतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीही शिरुर लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच, २००९ मध्ये लांडे यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे भोसरीतील या दोन्ही नेत्यांची भूमिका शिरुरसाठी निर्णायक ठरणार आहे.