काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसहित भाजप नेत्यांनी सुद्धा पडळकरांना सुनावले होते. यावर गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची आता गरज नाही. पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
त्यानंतर गोपीचंद पडळकर आता दुसऱ्या वादात अडकले आहेत. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आगरकरांऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला, त्यानंतर सोशल मीडियात याबाबत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली असं सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. नेटिझन्सने हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली, लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले आहे.